‘उज्ज्वला’नंतर आता ‘लाडकी बहीण’ही बंद होणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा; सरकारवर फसवणुकीचा गंभीर आरोप

मुंबई : उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर आणण्याच्या निर्णयाने देशभरात चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतही मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधत, “आज उज्ज्वला योजनेवर कात्री चालली, उद्या लाडकी बहीण योजनेचंही तेच होऊ शकतं,” असा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदान मिळणाऱ्या एलपीजी सिलिंडरची वार्षिक मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लाखो लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “उज्ज्वला योजनेतील सिलिंडरची संख्या आधी १२ वरून ९ आणि आता ९ वरून थेट ४ करण्यात आली. अशा पद्धतीने योजना टप्प्याटप्प्याने कमकुवत केली जात असेल, तर उद्या ती पूर्णपणे बंद झाली तरी आश्चर्य वाटणार नाही.”
रोहित पवार यांनी याचवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात योजना सुरू करण्यात आली, मात्र आता विविध निकष लावून लाखो महिलांना लाभापासून वंचित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “निवडणुकीत मतांसाठी सरसकट लाभ दिला गेला, पण आता निकषांच्या नावाखाली महिलांना योजनेतून बाहेर काढले जात आहे. पुढे आणखी कठोर अटी लागू करून लाभार्थ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी केली जाईल किंवा योजना बंद केली जाईल,” असा दावा त्यांनी केला.

याशिवाय त्यांनी सरकारला “मतांसाठी जनतेची फसवणूक करणारे विश्वासघातकी सरकार” असे संबोधत पुढील निवडणुकांपूर्वी पुन्हा नव्या योजनांचे आमिष दाखवले जाईल, असा आरोप केला. त्यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेत सुरुवातीला १२ सिलिंडरवर अनुदान दिले जात होते. नंतर ही संख्या ९ वर आली आणि आता केवळ ४ सिलिंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय लागू झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची चर्चा आहे.
रोहित पवार यांच्या दाव्यांमुळे लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे राज्यभरातील लाखो महिला आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.