‘पाणी जपून वापरा!’ पुण्यावर जलसंकटाचे सावट; १५ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिकेचे कडक निर्बंध लागू

पुणे : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांसाठी मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असताना आणि पावसाचे आगमन लांबत असल्याने अखेर पुणे महापालिकेने शहरात पाणीपुरवठ्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जूनपासून शहरातील बहुतांश भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक पुढील दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी धरणांतील पाणीसाठ्याची सद्यस्थिती मांडताना आगामी तीन महिने प्रशासनासमोर मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट केले.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या **खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ५.०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या अवघ्या १७.१९ टक्के इतकाच आहे. त्यामध्ये खडकवासला धरणात ०.८४ टीएमसी (४२.३३%), पानशेतमध्ये २.२७ टीएमसी (२१.३६%), वरसगावमध्ये १.९० टीएमसी (१४.८२%) तर टेमघर धरण जवळपास कोरडे पडले असून तेथे पाणीसाठा शून्यावर आला आहे.

महापालिका प्रशासनासमोर केवळ शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही, तर आगामी आषाढी वारी, ग्रामीण भागातील गरजा, शेतीसाठी लागणारे आवर्तन आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध साठा काटेकोरपणे वापरण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने काही कठोर निर्बंध लागू करण्याचाही निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व कार वॉशिंग सेंटर बंद करण्यात येणार आहेत. वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी असेल. बांधकाम प्रकल्पांसाठी महापालिकेचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात येणार असून त्यांना एसटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक असेल. खासगी आणि व्यावसायिक जलतरण तलावांवरही निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विहिरी आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण करून पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, काही भागांना या निर्णयातून अंशतः दिलासा मिळणार आहे. ज्या परिसरात आधीपासूनच कमी दाबाने किंवा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, त्या भागांवर अतिरिक्त कपात लादली जाणार नाही. हडपसर, काळेपडळ, कोल्हेवाडी, नांदोशी, महंमदवाडी, कोंढवा, धायरी, भाग्योदयनगर तसेच शिवाजीनगरमधील काही भाग यामध्ये समाविष्ट आहेत.
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन, वाढती लोकसंख्या आणि वाढलेली मागणी यामुळे पुढील तीन महिने उपलब्ध साठ्यावरच शहराला तग धरावा लागणार आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मान्सूनने सोलापूरपर्यंत प्रगती केल्याचे सांगितले असले तरी पुणेकरांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांसाठी आता “पाणी वाचवा, पाणी जपा” हा संदेश केवळ आवाहन राहिलेला नसून गरज बनला आहे. कारण पुढील काही आठवडे शहरातील प्रत्येक थेंबाची किंमत वाढणार आहे.