‘राज्यसभेचा गेमच फिरला!’ राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांच्यावर टाकला विश्वास; उमेदवारीनंतरची पहिली प्रतिक्रिया चर्चेत


मुंबई : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर विदर्भातील नेते राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास दाखवत मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असतानाच पक्षाच्या कोअर कमिटीने एकमताने जैन यांच्या नावाला मंजुरी दिली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जैन यांनी ही संधी एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान असल्याचे सांगितले. “पक्ष स्थापनेपासून मी कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो पूर्ण करण्यासाठी मी सर्व ताकद पणाला लावणार आहे. पक्षासाठी निष्ठेने काम केल्याचे आज फळ मिळाले आहे,” असे ते म्हणाले.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातून राजकारणात सक्रिय असलेले राजेंद्र जैन हे सहकार आणि संघटनात्मक क्षेत्रातील अनुभवी चेहरा मानले जातात. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांची निवड हा केवळ राजकीय निर्णय नसून विदर्भाला दिलेले प्रतिनिधित्व असल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नावही जोरदार चर्चेत होते. त्यामुळे पक्षाचा अंतिम निर्णय काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अखेर राष्ट्रवादीने विदर्भ कार्ड खेळत राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यानंतर भुजबळ नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम देत पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.

तटकरे यांनी सांगितले की, पक्षाने सखोल चर्चा करून हा निर्णय घेतला असून विदर्भाला संधी देण्याची भावना यामागे होती. जैन यांचा अनुभव, संघटनात्मक काम आणि सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, राजेंद्र जैन यांच्या निवडीमुळे विदर्भातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यसभेच्या माध्यमातून विदर्भातील प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे आगामी राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!