ATM मध्ये ‘कॅश क्रायसिस’चा भडका! SBI वर गंभीर आरोप, ग्रामीण भारतात नोटांचा तुटवडा; RBI कडे धाव, 100 कोटींची मागणी

नवी दिल्ली : देशातील ATM नेटवर्कमध्ये रोख रकमेचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने मोठा वाद पेटला आहे. ATM उद्योगाशी संबंधित कॉन्फेडरेशन ऑफ ATM इंडस्ट्री (CATMi) ने थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे तक्रार दाखल करत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कॅश वितरण धोरणावर गंभीर आरोप केले आहेत.

CATMi च्या म्हणण्यानुसार SBI कडून ATM मध्ये कॅश भरण्याला प्राधान्य मोठ्या महानगरांना दिले जात आहे, तर टिअर-2 आणि टिअर-3 शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात रोकड पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे अनेक ATM बंद पडत असून ऑपरेटर्सना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर CATMi ने बँकिंग उद्योगाकडून तब्बल 100 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ATM बंद राहिल्यास ट्रान्झॅक्शन आणि इंटरचेंज फीचे उत्पन्न कमी होत असल्याने संपूर्ण ATM व्यवसाय संकटात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

द इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, SBI कडे देशभरात सुमारे 65,000 ATM चे विशाल नेटवर्क आहे. यापैकी सुमारे निम्म्या ATM मध्ये कॅश भरण्याचे काम थेट बँकेकडून केले जाते. मात्र ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये रोकड पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संघटनेने SBI ला 20 जूनपर्यंत समस्या सोडवण्याचा अल्टिमेटम दिला असून, अन्यथा ATM नेटवर्क आणखी तोट्यात जाईल आणि अनेक मशीन बंद होण्याची शक्यता वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ATM ऑपरेटर्ससमोर वाढत्या खर्चाचे मोठे आव्हान उभे आहे. किमान वेतनात मोठी वाढ, इंधन दरवाढ आणि देखभाल खर्च वाढल्याने व्यवसायावर आर्थिक ताण वाढला आहे. दुसरीकडे डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे ATM व्यवहारांची संख्या सतत घटत आहे.
आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये दरमहा 57 कोटी व्यवहार होत होते, मात्र सप्टेंबर 2025 पर्यंत ही संख्या 43.95 कोटींवर घसरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ATM सेवा टिकवणे कठीण झाले आहे.
CATMi च्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 नंतर बँक शाखा आणि करन्सी चेस्टमधून रोकड मिळवणेही अवघड होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ATM सेवा धोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
भारतात ATM ची संख्या देखील कमी होत असून 2024-25 मध्ये ती 2.53 लाखांवरून 2.51 लाखांवर आली आहे. ही घट विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिक जाणवत आहे.
जर ही कॅश टंचाईची समस्या लवकर दूर झाली नाही, तर छोट्या शहरांमध्ये ATM सेवा मोठ्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. RBI च्या भूमिकेकडे आता संपूर्ण ATM उद्योगाचे लक्ष लागले आहे.