कॉकरोच जनता पार्टीची ताकद वाढणार? OBC चा बडा नेता प्रवेशाच्या तयारीत; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट?
सांगली : राज्यातील राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला लवकरच मोठे राजकीय बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओबीसी आंदोलनातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी गरज पडल्यास ‘कॉकरोच जनता पार्टी’तही सहभागी होण्यास तयार असल्याचे संकेत हाके यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर जोरदार टीका केली. राज्यातील बहुजन, ओबीसी आणि सामान्य समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी सध्याच्या नेतृत्वावर निशाणा साधला. “प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी मोठे उद्योगपती किंवा धनाढ्य लोक पुढे येणार नाहीत. ही लढाई सामान्य तरुणांनीच लढायची आहे. परिवर्तनासाठी युवकांची शक्तीच निर्णायक ठरणार आहे,” असे ते म्हणाले.
हाके यांच्या या वक्तव्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’मध्ये त्यांच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. अद्याप त्यांनी अधिकृत प्रवेशाबाबत कोणतीही घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात सक्रिय असलेल्या हाके यांचा कोणताही राजकीय निर्णय आगामी समीकरणांवर परिणाम करू शकतो, असे मानले जात आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी स्थापन केलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ गेल्या काही दिवसांत चर्चेत आली आहे. विद्यार्थी, युवक आणि व्यवस्थेविरोधातील असंतोषाला राजकीय व्यासपीठ देण्याचा प्रयत्न म्हणून या पक्षाकडे पाहिले जात आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने या नव्या संघटनेकडे तरुणांचे लक्ष वेधले गेले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, लक्ष्मण हाके यांच्यासारखा ओबीसी समाजातील प्रभावी नेता या नव्या राजकीय प्रवाहासोबत आल्यास त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू शकतात. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही केवळ सोशल मीडियापुरती चर्चा राहणार की प्रत्यक्ष राजकारणात प्रभाव निर्माण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हाके यांच्या एका विधानाने सुरू झालेल्या या चर्चेमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.