पुणेकरांसाठी गुडन्यूज! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपासून धावणार..


पुणे : पुणेकरांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करून तो प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

या निर्णयामुळे पुणेकरांना येत्या काही आठवड्यांत मेट्रोने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पहिल्या टप्प्यातील सेवा सुरू झाल्यानंतर मार्गावरील निम्म्या अंतराचा प्रवास सुलभ होणार आहे. मात्र संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते.

प्रशासनाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, वरिष्ठ स्तरावरून 30 जूनची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी काही तांत्रिक कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके 15 जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील दीड ते दोन महिन्यांत उर्वरित स्थानकेही प्रवाशांसाठी खुली करण्यात येतील.

विशेष म्हणजे, हा देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारला जाणारा पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. सुमारे 8,313 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जात असलेला हा 23.2 किलोमीटर लांबीचा संपूर्ण उन्नत मार्ग आहे. या प्रकल्पात टाटा समूह समूहाची टीआरआयएल आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स या कंपन्यांचा सहभाग आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!