RBI चा मोठा निर्णय जाहीर! रेपो रेट कायम; गृहकर्ज, वाहन कर्ज आणि EMI वर काय होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅस सिलिंडर, खाद्यतेल आणि भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे. ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे अनेक देशांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेचा परिणाम भारतावरही होऊ शकतो, मात्र देशाची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे.
देशातील महागाईचा दर नियंत्रणात असून उत्पादन आणि सेवा क्षेत्राची कामगिरीही समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी मौद्रिक धोरण समितीने यावेळी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

RBI च्या बैठकीत रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर 5.00 टक्के आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर 5.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर वैयक्तिक कर्जधारकांना होणार आहे. रेपो दरात वाढ न झाल्याने बँकांच्या कर्जावरील व्याजदर वाढण्याची शक्यता सध्या टळली आहे. त्यामुळे लाखो कर्जदारांचे EMI वाढणार नसून महागाईच्या काळात नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.