PM Kisan चा 23 वा हप्ता कधी जमा होणार? विसरू नका 30 जूनची डेडलाइन; अन्यथा 2 हजार रुपये अडकणार

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लवकरच योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असून त्याआधी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात 22 हप्ते जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे.
मात्र, पुढील हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार 30 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पुढील 2 हजार रुपयांचा हप्ता अडकू शकतो.

सरकारकडून बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी पडताळणी मोहीम राबवली जाते. ई-केवायसी अपूर्ण असल्यास किंवा नाव, बँक खाते क्रमांक व इतर माहितीत त्रुटी असल्यास हप्ता जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येते.
ऑनलाइन प्रक्रिया करता येत नसल्यास जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे पुढील हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही