चारधाम यात्रेसाठी नवे नियम लागू; भाविकांच्या सुरक्षितता आणि सुविधांसाठी सरकारचा मोठा निर्णय…


नवी दिल्ली : चारधाम यात्रेत वाढत्या गर्दीमुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी होणारी झुंबड आणि व्यवस्थेतील त्रुटी दर्शविणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संपूर्ण चारधाम यात्रेसाठी नवीन आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी भाविकांची संख्या वाढल्यास वाहने आणि यात्रेकरूंना विविध होल्डिंग एरिया व तपासणी नाक्यांवर थांबवण्यात येणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

यात्रेकरूंना ज्या ठिकाणी थांबवले जाईल, तेथे त्यांना विलंबाचे कारण आणि पुढील प्रवासासाठी लागणारा अंदाजित वेळ याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी एफएम रेडिओ, एलईडी स्क्रीन आणि सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे.

तसेच भाविकांच्या सोयीसाठी होल्डिंग एरियामध्ये पिण्याचे पाणी, भोजन आणि वाहन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यात्रेदरम्यान भाविकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना त्यांच्या सेवा व खाद्यपदार्थांचे दर दर्शनी भागात लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्नाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी प्रशासनाकडून नियमित तपासणीही केली जाणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी मालवाहू वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आता जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या गाड्यांना केवळ रात्रीच्या वेळेतच प्रवास करता येणार आहे. याशिवाय रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सर्वसामान्य प्रवासी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

चारधाम यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षितता, सुविधा आणि सुरळीत दर्शन व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!