खंडोबाच्या भक्तांसाठी मोठी बातमी! जेजुरीत भंडारा खरेदीसाठी सक्ती करणाऱ्यांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेजुरी गडावर विशिष्ट दुकानातूनच भंडारा खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्यांविरोधात आता पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. भाविकांवर दबाव टाकून भंडारा विक्री करण्याचा प्रयत्न झाल्यास तो प्रकार थेट खंडणीचा गुन्हा मानला जाईल, असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिला आहे.

भंडाऱ्याच्या उधळणीमुळे ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्रात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून ‘आमच्याकडूनच भंडारा घ्या’ अशी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. त्यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, भाविकांना भंडारा किंवा पूजेचे साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास भाग पाडणे सहन केले जाणार नाही. अशा प्रकारे दबाव टाकल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

जेजुरी परिसरात पार्किंग आणि भंडारा विक्रीवरून होणारे वाद लक्षात घेऊन प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही दुकानातून भंडारा व पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यामुळे जेजुरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.