घरी परतताना काळाचा घाला; कवडीपाट परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू..


लोणी काळभोर : दुचाकीवरून घरी परतत असलेल्या एकास भरधाव वेगाने आलेल्या हायवा डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पडला आहे. सदर अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवार (२ मे) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारांस कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात झाला आहे.

या अपघातात मोहन जगन्नाथ माळवदकर (वय-५६, रा. गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळवदकर हे पेंटिंगचे काम करतात. काम आटोपून ते आपल्या दुचाकीवरून गुजरवस्ती येथील घराकडे निघाले होते. लोणी काळभोर बाजूकडून महामार्गावरील कवडीपाट परिसराजवळ असणारा रस्ता दुभाजक ओलांडत असताना, हडपसर बाजूकडून आलेल्या मातीने भरलेल्या हायवा डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की, माळवदकर रस्त्यावर पडताच डंपरचे अवजड चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

अपघातग्रस्त डंपरला फक्त पुढच्या बाजूला नंबर प्लेट लावलेली आहे, तर पाठीमागच्या बाजूला आणि इतर कुठेही कोणताही नंबरप्लेट नाही. पुणे-सोलापूर महामार्गावर विना नंबर प्लेटचे, ओव्हरलोड माती-वाळू वाहतूक करणारे डंपर पोलीस आणि आरटीओच्या राजरोसपणे सुसाट धावत असतात.

या डंपर चालकांवर कोणतीही कडक कारवाई केली जात नाही आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत, असा संतप्त सवाल गुजरवस्ती आणि कवडीपाट परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!