‘अर्जावर हरकत अन् राजकारणात खळबळ!’ पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊत अडचणीत; विधानपरिषद लढतीत नवा सस्पेन्स

पुणे : विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता छाननी प्रक्रियेत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे आणि सोलापुरात महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होत असतानाच या घडामोडींनी समीकरणांमध्ये नव्याने खळबळ उडवली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अर्जांची छाननी सुरू आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजीमुळे निवडणूक आधीच चर्चेत असताना आता हरकतींच्या मुद्द्याने वातावरण आणखी तापले आहे.
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या अर्जावर मालमत्ता करासंदर्भातील माहिती शपथपत्रात नमूद न केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. संबंधित माहिती लपविल्याचा दावा करत त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, विक्रम काकडे यांच्या कार्यालयाकडून संबंधित मालमत्ता काही वर्षांपूर्वीच विकण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्या व्यवहाराची कागदपत्रे निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सोलापूरमध्येही महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर हरकत नोंदवण्यात आली आहे. अर्जातील काही तपशील आणि शासकीय सुविधांबाबतची माहिती अपूर्ण असल्याचा दावा हरकतदारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरमधील लढतही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
याशिवाय काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावरही तांत्रिक हरकत घेण्यात आल्याने छाननी प्रक्रिया अधिकच गाजत आहे. विविध हरकतींवर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी पार पडली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने पुढील दोन दिवस राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हरकतींवरील निर्णय, संभाव्य माघारी आणि बंडखोरांची पुढील भूमिका यावर विधानपरिषद निवडणुकीची अंतिम समीकरणे अवलंबून असणार आहेत.