70 सीसीटीव्ही, 16 तासांची शर्यत अन् चिमुकलीचा शोध; पुणे पोलिसांच्या ‘ऑपरेशन बेबी रेस्क्यू’ची यशोगाथा

पुणे : रेल्वे स्थानक परिसरातून एका वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांनी राबवलेल्या धडाकेबाज शोधमोहीमेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अवघ्या 16 तासांत चिमुकलीची सुखरूप सुटका करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या कारवाईसाठी तब्बल 70 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

शिरूर तालुक्यातील एका 21 वर्षीय महिलेचा कौटुंबिक वाद झाल्यानंतर ती आपल्या एक वर्षाच्या मुलीसह पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. राहण्याची सोय नसल्याने आई-मुलगी रेल्वे स्थानकाजवळील परिसरात रात्री थांबल्या. मात्र रात्री उशिरा झोपेतून जाग आल्यानंतर मुलगी शेजारी नसल्याचे लक्षात येताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.
घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक, प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

सलग 12 तास सुरू असलेल्या या तपासात 70 पेक्षा अधिक कॅमेऱ्यांतील दृश्ये बारकाईने पाहण्यात आली. अखेर एका फुटेजमध्ये दोन महिला आणि एक पुरुष चिमुकलीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात हे तिघे रेल्वेने पुण्याबाहेर रवाना झाल्याचे समोर आले.

त्यानंतर पुणे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधत शोधमोहीम अधिक तीव्र केली. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत विशेष पथक दौंडकडे रवाना झाले. रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी चिमुकलीला सोबत नेल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करून तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले. प्राथमिक तपासात बालतस्करीच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिस या दृष्टीने अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अल्पावधीत चिमुकलीचा शोध लावून तिला सुरक्षित परत आणण्यात यश मिळवल्याबद्दल पुणे पोलिसांच्या तत्परतेचे आणि समन्वयपूर्ण कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रकरणातील तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.