तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई: पिंपरी विषारी दारूकांडाचं भिवंडी कनेक्शन उघड; 5,929 किलो मिथेनॉल जप्त

पिंपरी-चिंचवड : राज्यात 22 निष्पापांचा बळी घेणाऱ्या पुणे–पिंपरी-चिंचवड विषारी दारूकांड प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राबवण्यात आलेल्या धडक कारवाईत भिवंडी कनेक्शन समोर आले असून, सुमारे 5,929 किलो मिथेनॉलचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यातील अवैध रसायन आणि भेसळ दारू साखळी उघडी पडली आहे.

पुण्यातील भीषण मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विषारी गावठी दारूच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. या दारू निर्मितीसाठी वापरलेले मुख्य घातक रसायन भिवंडीतून पुरवले गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एफडीएने तात्काळ सूत्र हलवत भिवंडी परिसरातील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ या गोदामावर छापा टाकला.
या छाप्यात कोणतीही वैध नोंद नसलेला आणि मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरणारा मिथेनॉलचा प्रचंड साठा आढळून आला. अधिकाऱ्यांच्या मते, हे रसायन बेकायदेशीररीत्या साठवून ठेवले गेले होते आणि त्याचा वापर भेसळयुक्त दारू तयार करण्यासाठी करण्यात आला.

तपासात या रसायनाच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळीही उघड झाली आहे. भिवंडीतील या गोदामातून मिथेनॉल कर्नालसिंग विरका, मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि उरळी कांचन येथील राजू प्रजापती यांच्या नेटवर्कमार्फत पुण्यात पोहोचले. या साखळीच्या माध्यमातून तयार केलेली विषारी दारू बाजारात विकली गेली आणि त्यातून 22 नागरिकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, एफडीएच्या या धडाकेबाज कारवाईनंतर ठाणे जिल्ह्यातही मोठी तपासमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 7 लाख रुपयांचा संशयास्पद माल जप्त करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच राज्यभर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिल्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच वेळी धडक छापेमारी सुरू झाली आहे.
या संपूर्ण मोहिमेमुळे विषारी दारू प्रकरणातील पुरवठा साखळीचा मोठा पर्दाफाश झाला असून पुढील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.