हिंजवडीत ‘नाईट शटडाउन’चा धक्का! आयटी कंपनी अचानक गायब; 700 अभियंत्यांचे करिअर टांगणीला, पगारही थकले


पुणे : देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टप्पा क्रमांक 2 मधील एका आयटी कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालय बंद केल्याने शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनीत कार्यरत असलेल्या सुमारे 700 आयटी अभियंत्यांचे भविष्य अचानक अंधारात गेले असून, अनेक कर्मचारी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम राबवली होती. विशेषतः फ्रेशर्स आणि प्रशिक्षणार्थी उमेदवारांना संधी देत शेकडो तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. सुरुवातीला दरमहा सुमारे 15 हजार रुपयांचे मानधन देऊन त्यांना कामावर ठेवण्यात आले. काही महिन्यांपर्यंत कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनाही भविष्यातील करिअरबाबत आशावाद होता.

मात्र, यंदाच्या फेब्रुवारीपासून परिस्थिती बदलू लागली. कर्मचाऱ्यांच्या पगारात सातत्याने विलंब होऊ लागला. दर महिन्याच्या सुरुवातीला खात्यात जमा होणारा पगार उशिरा येऊ लागला आणि नंतर काही कर्मचाऱ्यांना पूर्ण महिनाभरही वेतन मिळाले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे वारंवार विचारणा केली. त्यावेळी कंपनीकडून अंतर्गत लेखापरीक्षण सुरू असल्याचे कारण देण्यात आले. तसेच थकीत वेतन लवकरच दिले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास दिला जात असतानाच अचानक एका रात्री कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले. दुसऱ्या दिवशी कर्मचारी कार्यालयात पोहोचले तेव्हा कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

धक्कादायक बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांना थकीत वेतनासाठी धनादेश देण्यात आले होते. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते वटले नसल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पगार तर मिळालाच नाही, उलट त्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.

याशिवाय कंपनीने लॅपटॉप आणि इतर उपकरणांच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांकडून सुमारे 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कंपनी अचानक बंद झाल्यानंतर ही रक्कम परत मिळण्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी प्रभावित कर्मचाऱ्यांनी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ या संघटनेकडे धाव घेतली आहे. संघटनेच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. कंपनीचे संचालक, आर्थिक व्यवहार आणि कर्मचाऱ्यांशी झालेल्या करारांची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने केंद्रीय कामगार मंत्रालयालाही पत्र पाठवून आयटी क्षेत्रातील अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमांची मागणी केली आहे. तरुण अभियंत्यांचे करिअर आणि आर्थिक सुरक्षितता धोक्यात येणार नाही यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

हिंजवडीसारख्या देशातील प्रतिष्ठित आयटी केंद्रात घडलेल्या या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील रोजगार सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेकडो अभियंते आता न्याय आणि थकीत वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!