‘ड्राफ्ट नको, थेट आदेश द्या!’; रखरखत्या उन्हात जरांगेंचं आमरण उपोषण सुरू, सरकारकडून तोडगा निघणार?

जालना : मराठा आरक्षणाच्या लढ्याला पुन्हा एकदा निर्णायक वळण मिळालं असून, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. प्रचंड उष्णता आणि कडक उन्हाची पर्वा न करता जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिल्याने राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यांच्या आंदोलनामुळे सरकार आणि प्रशासनाची धावपळ वाढली असून, आज महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या बैठकीत आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा झाली. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम राहिले. त्यानंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
आज पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवाली सराटीत दाखल होणार असून, सरकारच्या भूमिकेसंदर्भातील लेखी आश्वासन घेऊन ते जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या चर्चेकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजातील लाखो नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र आणि त्याची वैधता देण्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करणे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून अनेकदा मसुदे किंवा आश्वासनं दिली जातात; मात्र ती प्रत्यक्ष प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे केवळ ड्राफ्ट किंवा लेखी आश्वासन नको, तर संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश जारी करण्यात यावेत, अशी त्यांची भूमिका आहे.

“आम्ही ड्राफ्ट स्वीकारू, पण तो फक्त कागदावर राहू नये. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला आदेश पोहोचला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र आणि वैधता देण्याची प्रक्रिया न केल्यास संबंधितांवर कारवाई होईल, असे स्पष्ट निर्देश सरकारने द्यावेत,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताना केली.
यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. “मला माझ्या जीवाची चिंता नाही. मराठा समाजाचं हित आणि त्यांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक महत्त्वाचा आहे,” असे भावनिक वक्तव्यही त्यांनी केले.
दरम्यान, सरकारकडून आज काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे पाटील यांना काही मुद्द्यांवरील लेखी मसुदा दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास ते तयार नसल्याने सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील आजची चर्चा निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी मराठा बांधवांची मोठी गर्दी होत असून, आंदोलनाचा पुढील टप्पा आणि सरकारची भूमिका यावर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.