शिवसंवाद मेळाव्यावर शोककळा; श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू..

बीड : शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बीड दौऱ्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. केज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसंवाद मेळाव्यात’ निवेदन देण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केज शहरात शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. याच दरम्यान एक ज्येष्ठ नागरिक खासदारांना निवेदन देण्यासाठी मेळाव्यात आले होते.
बीड जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशा कडक उन्हात बराच वेळ थांबल्यानंतर संबंधित वृद्ध नागरिकांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संवाद मेळावा बंदिस्त हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हॉलमध्ये मोठी गर्दी आणि अपुरी हवा यामुळे उपस्थितांना उकाड्याचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यावर दु:खाची छाया पसरली असून केज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
