हवामान खात्याचा मोठा इशारा! आज राज्यात वादळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट


पुणे : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा दुहेरी फटका पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमान 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) 29 मेसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 31 मेपर्यंत राज्यातील बहुतांश भाग मान्सूनपूर्व पावसाच्या प्रभावाखाली येऊ शकतो.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात दमट हवामानामुळे उकाडा वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या उष्ण व कोरडे हवामान कायम असले तरी 30 मेपासून परिस्थिती बदलण्याची शक्यता असून 31 मे रोजी अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील धाराशिव,
लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, नागपूर आणि अमरावतीसह विदर्भातील आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेची लाट कायम असतानाच वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!