कांद्याच्या प्रश्नावर दिल्लीदरबारी महत्वाची बैठक, तोडगा निघाला? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती आली समोर


दिल्ली : कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिल्लीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

या उच्चस्तरीय बैठकीत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजारात कांदा खरेदी करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने या मागणीला मान्यता दिली असून आता केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणार आहे. तसेच सध्या २ लाख मेट्रिक टन असलेले कांदा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून १० लाख मेट्रिक टन करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

ते उद्दिष्ट वाढवून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. कांदा खरेदीचा दर कालच १२ रुपये ३८ पैसे प्रति किलोवरून वाढवून १५ रुपये ८० पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे.

तसेच देशातून मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्यांची निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांदा निर्मितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कांदा बियाणे निर्यातीवर शुल्क लावण्याची मागणी मुख्यमंत्री यांनी या बैठकीत केली. लवकरच बियाणे निर्यातीवरही निर्यात शुल्क लावण्यात येणार आहे. याशिवाय वारंवार निर्माण होणाऱ्या कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजनांचीही बैठकीत चर्चा झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, धनंजय महाडिक, आ. दिलीप वळसे-पाटील, आ.जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!