मोदी सरकारचा मोठा निर्णय! रेशन योजनेत होणार मोठे बदल, 80 कोटी लाभार्थ्यांवर थेट परिणाम…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशन योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम देशातील तब्बल 80 कोटी शिधापत्रिकाधारकांवर होणार आहे.

कॅबिनेट बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशभरातील लाभार्थ्यांना अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने रेशन मिळावे यासाठी योजनेत तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.
या बदलांमध्ये राज्य सरकारांचा अधिक समन्वय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि लाभार्थ्यांची नोंदणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे बनावट लाभार्थ्यांवर नियंत्रण येण्यास मदत होणार असून पात्र नागरिकांना अधिक वेगाने लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे जे रेशन वाटप करणारे दुकानदार आहेत, (डीलर) त्यांचं कमिशन वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. रेशन वाटप करणाऱ्या दुकानदारांचं कमिशन गेल्या अनेक दिवसांपासून वाढवण्यात आलेलं नाहीये, कमिशन वाढवाव अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने रेशन दुकानदारांना दिलासा देण्याच निर्णय घेतला आहे, त्याच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आता रेशन वाटप प्रणालीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रेशन वाटप प्रणाली अधिक पारदर्शी व्हावी, भ्रष्टाचाराला आळा बसावा या उद्देशाने संपूर्ण योजनेचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन केलं जाणार असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांदिली दिली आहे. नव्या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांची नोंदणी ही एआय मार्फत केली जाणार आहे.