“दुश्मनाच्या वाढदिवसाला गेलास?”; भररस्त्यात तरुणावर थरारक हल्ला, कल्याण हादरलं

कल्याण : रस्त्याच्या मधोमध एक तरुण जीव वाचवण्यासाठी ओरडत होता, मदतीसाठी आक्रोश करत होता… पण समोर उभे असलेले काही युवक त्याला थांबण्याची एकही संधी देत नव्हते. लाथा, बुक्के आणि लोखंडी पत्र्याने सुरू असलेला हा थरारक हल्ला पाहून परिसरातील लोकही हादरले. कल्याणमधील मोहने परिसरात क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लहुजी नगर भागात मोन्या फुलारी या तरुणाला काही युवकांनी भररस्त्यात अडवले. “आमच्या दुश्मनाच्या वाढदिवसाला का गेला?” असा जाब विचारत त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद हिंसक बनला आणि आरोपींनी मोन्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण सुरू केली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भावड्या, बाब्या आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मोन्याच्या अंगावर अक्षरशः तुटून पडत लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी लोखंडी पत्र्याने त्याच्या डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://x.com/i/status/2059565315206598702

घटनेदरम्यान परिसरातील एका तरुणीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. हा चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रफितीत जखमी तरुण धायमोकलून रडताना, जीव वाचवण्यासाठी विनवण्या करताना दिसत आहे. मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढे न आल्याचेही यात स्पष्ट दिसते.
विशेष म्हणजे, ही घटना पोलिस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, किरकोळ कारणावरून वाढणारी तरुणांमधील हिंसक मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. समाजमाध्यमांवर या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी चित्रफितीच्या आधारे तपास वेगाने सुरू केला असून, संबंधित आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.