थेऊर येथे दुर्दैवी घटना! साप पकडताना २१ वर्षीय सर्पमित्राचा मृत्यू..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथील २१ वर्षीय तरुण सर्पमित्राचा साप पकडत असताना साप चावून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सदर घटना कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवार (२५ मे) रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेत दिपक संतोष जाधव (वय २१, रा. सिद्धेश्वर मंदिर रोड, काळे वस्ती, थेऊर. ता. हवेली) या सर्पमित्राचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील विषारी व बिनविषारी साप विनामोबदला पकडत होता. तो एक सक्रिय गोरक्षक आणि सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता.

कुठेही कोणाच्या घरात किंवा शेतात साप निघाल्यास नागरिक दिपकला फोन करत असत आणि तो देखील जीवाची पर्वा न करता तातडीने तिथे पोहोचून सापांना सुखरूप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडत होता.

सोमवारी सायंकाळी कोलवडी ग्रामपंचायत हद्दीत साप निघाल्याची माहिती दिपक याला मिळाली होती. त्यानुसार तो नेहमीप्रमाणे सापाला जीवदान देण्यासाठी तेथे पोहोचला. शोधमोहीम सुरू असताना, एका ठिकाणी पडलेल्या पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली साप लपल्याचा त्याला संशय आला. दिपक याने पत्र्याच्या खाली हात घातला असता यावेळी पत्र्याखाली दबा धरून बसलेल्या सापाने त्याच्या हाताला दंश केला.

सर्पदंश झाल्याचे निदर्शनास येताच नागरिक व मित्रांनी दीपकला उपचारासाठी तात्काळ पुणे येथील ससून रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!