युद्धाची ठिणगी पडताच सोन्याने घेतली आकाशभरारी! इराण-अमेरिका तणावामुळे भारतात सोने-चांदीचे दर भडकले


पुणे : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद होताच त्याची झळ आता थेट भारतीयांच्या खिशाला बसू लागली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा भडकण्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठ हादरली असून, भारतात सोने आणि चांदीच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्याकडे धाव घेत असल्याने मौल्यवान धातूंचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

आज देशात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम तब्बल 1 लाख 58 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे, तर चांदीनेही ऐतिहासिक झेप घेत किलोमागे 2 लाख 72 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे लग्नसराई, गुंतवणूक आणि दागिने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

बुलियन बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 57 हजार 870 रुपये इतका नोंदवला गेला. तर चांदीचा दर किलोमागे 2 लाख 71 हजार 920 रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत मोठा बदल नसला तरी चांदीच्या दरात तब्बल 1,880 रुपयांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 58 हजार 280 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोनं 1 लाख 45 हजार 90 रुपयांवर पोहोचलं आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोनं 1 लाख 58 हजार 740 रुपये तर 22 कॅरेट सोनं 1 लाख 45 हजार 512 रुपयांवर विकलं जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलर मजबूत होणे, भारतीय रुपयाची घसरण, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिका-इराण संघर्ष यांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोनं आणि चांदीकडे वळत असल्याने बाजारात मोठी खरेदी होत आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन आणि इराणी सैन्यातील चकमकीच्या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात मोठी खळबळ उडाली. शांतता चर्चांदरम्यान झालेल्या नव्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली असून त्याचा परिणाम आता थेट भारतीय बाजारपेठेवर दिसू लागला आहे.

दरम्यान, आगामी काही दिवसांतही सोने-चांदीच्या किमती वाढत राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष आता जागतिक घडामोडींवर खिळले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!