पुणे-सातारा हायवेवर ‘डेथ मिस्ट्री’; बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह, दार उघडताच उडाला थरार

भोर : पुणे-सातारा महामार्गावर भर दुपारी एक कार शांतपणे उभी होती… ना कोणती हालचाल, ना आतून कोणताही प्रतिसाद. उन्हाचा कडाका वाढत असतानाच स्थानिकांचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी कारचे दार उघडले आणि आत दिसलेले दृश्य पाहून एकच खळबळ उडाली. बंद कारमध्ये ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसर हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापूरव्होळजवळील सर्व्हिस रोडवर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (MH 46 CL 5952) अनेक तासांपासून एकाच ठिकाणी उभी होती. महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष या गाडीने वेधून घेतले. विशेष म्हणजे, गाडीच्या काचा पूर्ण बंद होत्या आणि आत कोणतीही हालचाल दिसत नव्हती. संशय आल्याने काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता एक तरुण सीटवर निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यानंतर तातडीने राजगड पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कार उघडून पाहणी केली असता संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख विजय शिवाजी पारेकर (वय ३०) अशी पटली असून तो सध्या मुंबईतील भांडुप येथे राहत होता. तर त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील काळेवाडी येथे असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, विजय पारेकर याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक तपासात शरीरावर गंभीर जखमांचे कोणतेही निशाण आढळून न आल्याने या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू की घातपात? या तिन्ही शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

राजगड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत कार आणि परिसराची बारकाईने तपासणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून महामार्गावर काही काळ नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.