राज्यात मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत? एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत गुप्त भेट; महायुतीत चर्चांना उधाण

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अत्यंत गुप्तपणे दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.

विशेष म्हणजे, या भेटीची कोणतीही अधिकृत माहिती आधी देण्यात आली नव्हती. शिंदे यांच्यासोबत राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा प्रभाव असलेले एक वजनदार माजी मंत्रीही उपस्थित असल्याने या बैठकीभोवतीचे गूढ आणखी वाढले आहे. त्यामुळे महायुतीतील समीकरणांमध्ये काही मोठी हालचाल सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे अधिकृत दौऱ्यावर दिल्लीला गेले होते. त्या वेळी त्यांनी अमित शहा यांच्यासोबत भेट घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र शहा यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ती भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे शिंदे गटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती. अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा अमित शहा यांच्या कार्यालयातून रविवारी भेटीसाठी वेळ देण्यात आल्याचा निरोप मिळाला.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने खासगी विमानाने दिल्ली गाठली. दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर शिंदे थेट बेंगळुरूला रवाना झाले आणि नंतर रात्री उशिरा ठाण्यात परतले. विशेष म्हणजे, या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे कोणताही शासकीय कर्मचारी किंवा वैयक्तिक सहाय्यक नव्हता.

या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी निवडणुका, जागावाटप आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर महत्त्वाची चर्चा झाल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे आणि काही काळ दुरावलेले ते ‘शिक्षणसम्राट’ माजी मंत्री या दौऱ्यात सतत त्यांच्यासोबत दिसल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा आणखी रंगली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गुप्त बैठकीमुळे महायुतीतील मित्रपक्षांसह विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.