“बाबा आम्हाला कुठे नेताय?”… काही क्षणांत चार चिमुकल्यांचा भयानक शेवट; जळगाव हादरलं

जळगाव जामोद : “बाबा आम्हाला कुठे नेताय?”… या निरागस प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या चार चिमुकल्यांनाही मिळालं नसेल. पण काही क्षणांतच काळाने त्यांना गाठलं आणि जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. पत्नीशी झालेल्या वादानंतर एका पित्याने स्वतःच्या चार मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी उघडकीस आली.

राजुरा धरण परिसरातील एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. मृत व्यक्तीची ओळख विजय मुसा किराडिया अशी झाली असून प्रित, प्राची, पूर्वी आणि पियुष अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांचे पत्नीशी शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले होते. वाद वाढल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर विजय मानसिक तणावाखाली होते. रविवारी सकाळी त्यांनी मुलांना चहा करून दिला. घरातील काम करत असताना त्यांच्या वडिलांनी पत्नीबाबत विचारणा केली. यानंतर विजय अधिकच अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहे.

काही वेळातच त्यांनी चारही मुलांना सोबत घेत जवळील शेतातील विहीर गाठली. संताप आणि नैराश्याच्या भरात त्यांनी एकामागून एक चारही मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने तेही विहिरीत पडले. पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, काही वेळाने शेतमालक घटनास्थळी पोहोचले असता विहिरीजवळ मोबाईल, चपला आणि तुटलेली दोरी आढळून आली. संशय आल्याने त्यांनी विहिरीत पाहिले असता मृतदेह दिसले. त्यांनी तातडीने जळगाव जामोद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एका क्षणाच्या रागाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.