बुधवार पेठेत मध्यरात्री ‘ऑपरेशन सागर’! पोलिसांच्या धाडीत ६ विदेशी तरुणी जेरबंद; पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : बुधवार पेठेतील अरुंद गल्लींमध्ये रविवारी मध्यरात्री अचानक पोलिसांच्या गाड्यांचे सायरन घुमू लागले आणि काही क्षणांतच कुप्रसिद्ध ‘सागर बिल्डिंग’भोवती पोलिसांचा फौजफाटा उभा राहिला. आत सुरू असलेल्या हालचालींनी पोलिसांचाही संशय बळावला आणि त्यानंतर उघडकीस आलं एक धक्कादायक वास्तव. पुणे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सहा विदेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आलं असून, त्या बेकायदेशीररीत्या भारतात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे बुधवार पेठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी रात्री शहरभर तपासणी मोहीम राबवण्यात आली. याचदरम्यान परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांना बुधवार पेठेतील ‘सागर बिल्डिंग’मध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने इमारतीवर अचानक छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांना सहा विदेशी तरुणी आढळून आल्या. चौकशीत त्या बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने भारतात आणण्यात आल्याचे समोर आले. या महिला बुधवार पेठेत राहत असून वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व महिलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात महिलांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांना सुरुवातीला ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि घरकामाच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. चांगल्या नोकरीच्या आशेने त्या भारतात आल्या, मात्र पुण्यात आणल्यानंतर त्यांना थेट बुधवार पेठेत आणून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आले. तपासादरम्यान काही महिलांनी स्वमर्जीने या व्यवसायात सहभागी झाल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणामागे मोठे मानवी तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलांना भारतात आणणारे दलाल कोण, त्यांनी सीमा कशी पार केली, बनावट कागदपत्रे कुठून मिळाली याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधितांच्या मोबाईल, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, गेल्या ११ महिन्यांत पुणे पोलिसांनी शहरातील विविध भागांतून तब्बल १०३ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अनेकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. बुधवार पेठेतील या कारवाईनंतर शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर घुसखोरी आणि मानवी तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे.