‘कोरोनानंतर आता इबोलाचं संकट?’ WHO च्या अलर्टनंतर पुणे विमानतळावर हाय अलर्ट; प्रवाशांची कसून तपासणी सुरू


पुणे : काही वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात निर्माण केलेली भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. अशातच आता पुन्हा एकदा जगावर एका जीवघेण्या विषाणूचं सावट गडद होताना दिसत आहे. ‘इबोला’ या अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली असून, भारतातही केंद्र सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर विशेष खबरदारी घेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषतः बँकॉक आणि दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. विमानतळावर उतरताच सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग केली जात असून, विमानातच त्यांच्या आरोग्यविषयक माहितीची नोंद घेतली जात आहे. विमानतळ परिसरात स्वतंत्र तपासणी कक्ष उभारण्यात आला असून, पीपीई किट घातलेले डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी प्रत्येक प्रवाशाची तपासणी करत आहेत.

संशयित लक्षणे दिसल्यास संबंधित प्रवाशाला तातडीने विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर स्थिती आढळल्यास रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात हलवले जाणार आहे. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत पुणे विमानतळावर इबोलाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही.

इबोला हा जगातील सर्वात धोकादायक विषाणूंमध्ये गणला जातो. या आजाराचा मृत्यूदर ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर २ ते २१ दिवसांनी लक्षणे दिसू शकतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. पुढे आजार गंभीर झाल्यास शरीरातून रक्तस्त्राव सुरू होऊन अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. हा विषाणू हवेतून पसरत नसला तरी बाधित व्यक्तीच्या रक्त, घाम किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्कातून संसर्ग होऊ शकतो.

दरम्यान, इबोलाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व विमानतळे, बंदरे आणि आरोग्य विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचे आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!