‘शिवाजी कोण होता?’ वादात नवा ट्विस्ट; संजय गायकवाड यांना कोर्टाचा दणका, चौकशीला मंजुरी


कोल्हापूर : ‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकावरून सुरू झालेला राजकीय आणि सामाजिक तणाव आता न्यायालयापर्यंत पोहोचला असून या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांना मोठा झटका बसला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने या प्रकरणात पोलिस चौकशीला परवानगी दिल्याने पुढील तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे प्रकरण कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाशी संबंधित असून या पुस्तकाच्या शीर्षकावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आमदार गायकवाड यांनी पुस्तकाच्या मजकुरावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर वातावरण अधिकच तापले.

प्रकाशक प्रशांत आंबी यांनी याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आमदार गायकवाड यांची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने पोलिसांना चौकशीची परवानगी दिली.

दरम्यान, आमदार गायकवाड यांनी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या वादामुळे राज्यभरात आंदोलन, निदर्शने आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणात आणखी गंभीर बाब समोर आली असून प्रकाशक आंबी यांना अद्यापही धमक्या येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना शंभरहून अधिक धमकीचे फोन आले असून त्यांनी पुन्हा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

या वादामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!