जीभ छाटली, तोंडात नोटांची बंडलं कोंबली अन् गळा दाबून हत्या; माजी डीजीपींच्या घरातील ‘विश्वासघात’ उघड, पुण्यातून मोलकरीण अटकेत


हैदराबाद : रात्रीच्या शांततेत सगळं घर गाढ झोपेत होतं… पण त्याच वेळी एका विश्वासू मोलकरणीने घराचं दार उघडत मृत्यूला आत बोलावलं! हैदराबादचे माजी पोलीस महासंचालक विजय रंजन यांच्या घरात घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आहे. रंजन यांच्या पत्नी तनुजा रंजन यांची अमानुष हत्या करून तब्बल साडेतीन कोटींचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार घरात अनेक वर्षे विश्वासाने काम करणारी नेपाळी मोलकरीण कल्पना असल्याचे तपासात उघड झाले असून, तिला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

८ मेच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली. माजी डीजीपी विजय रंजन हे कामानिमित्त बंगळुरूमध्ये होते. घरात पत्नी तनुजा रंजन आणि त्यांच्या दोन मुली होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, कल्पनाने मध्यरात्री मुख्य गेट उघडून नेपाळमधील तीन साथीदारांना आत घेतले. हे तिघेही धारदार हत्यारे आणि चोरीसाठी लागणारे साहित्य घेऊन आले होते.

पहिल्या मजल्यावरील खोलीत तनुजा रंजन झोपलेल्या असताना आरोपींनी चोरी सुरू केली. आवाज झाल्याने तनुजा यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांचे हात-पाय बांधले आणि तोंड दाबले. मात्र, आपण पकडले जाऊ शकतो या भीतीने कल्पनानेच त्यांना जिवंत न सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

यानंतर आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठली. चोरीतील नोटांची बंडलं आणि कपडे तनुजा यांच्या तोंडात कोंबण्यात आले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांचे ओठ आणि जीभ कापण्यात आली. एवढ्यावरच न थांबता पुन्हा तोंडात नोटा कोंबून गळा दाबत त्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारावेळी त्यांच्या दोन मुली वरच्या मजल्यावर झोपलेल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरी मोलकरीण कामावर आल्यानंतर हा भयानक प्रकार उघडकीस आला. तनुजा रंजन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मोठा धक्का बसला. कल्पनाने नोकरीसाठी दिलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. ती दिल्लीहून कार्यरत असलेल्या एका आंतरराष्ट्रीय नेपाळी टोळीची सदस्य असल्याचा संशय आहे. श्रीमंत घरांमध्ये मोलकरीण म्हणून प्रवेश मिळवणे, विश्वास संपादन करणे आणि घरातील मौल्यवान वस्तूंची माहिती गोळा करणे, असे प्रशिक्षण या टोळीतील महिलांना दिले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

घटनेनंतर कल्पनाने मोबाईल बंद करून नामपल्ली स्थानकावरून रेल्वे पकडली होती. ती मुंबईमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीमांवर अलर्ट जारी केला. तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर पुण्यातील तिच्या मावशीच्या घरातून तिला ताब्यात घेण्यात आले.

मात्र, या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कल्पना पोलिसांच्या हाती लागली असली तरी तिचे तीन साथीदार साडेतीन कोटींचा मुद्देमाल घेऊन फरार आहेत. अटकेवेळी कल्पनाकडे कोणतीही रोकड किंवा दागिने सापडले नाहीत. त्यामुळे साथीदारांनीच तिला जाणीवपूर्वक मागे सोडून पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या हैदराबाद आणि दिल्ली पोलीस या संपूर्ण टोळीचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!