मेहंदीचा रंगही फिका झाला नव्हता… पण अवघ्या २८ दिवसांत नवदांपत्याने संपवलं आयुष्य; मेघा-सिद्धार्थच्या मृत्यूमागचं गूढ कायम

ग्वाल्हेर : लग्नाच्या मंडपात एकमेकांना सात जन्म साथ देण्याचं वचन दिलं, हातावरची मेहंदी अजून ताजी होती, नव्या संसाराची स्वप्नं नुकतीच रंगू लागली होती… पण नियतीने असा घाव घातला की अवघ्या २८ दिवसांत नवविवाहित मेघा आणि सिद्धार्थ या दोघांनीही या जगाचा निरोप घेतला. दोन दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दुहेरी मृत्यूने ग्वाल्हेर हादरलं असून, “नेमकं असं काय घडलं?” हा प्रश्न आता प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

ग्वाल्हेरमधील हुरावली लिंक रोड परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय मेघाचं २५ एप्रिल रोजी सिद्धार्थ कांदिल (२६) याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. सिद्धार्थ हा पिंटो पार्क येथील कुंज विहार कॉलनी फेस-१ परिसरात राहत होता. दोन्ही कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. मेघाचे वडील गुरुवीर सिंह यांनी मुलीच्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती.
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस मेघा सासरी आनंदात राहत होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती आनंदी आणि समाधानी दिसत होती. मात्र १ मे रोजी ती माहेरी आली आणि त्यानंतर काही दिवसांतच सगळं चित्र बदललं.

२० मे रोजी मेघाचे वडील एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. घरात मेघा आणि तिची आई गीता होत्या. दुपारच्या वेळी गीता या घराच्या पहिल्या मजल्यावर गेल्या असता त्यांना मेघा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारी आणि नातेवाईक घराकडे धावले. कुटुंबीयांनी तातडीने मेघाला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मेघाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला तेव्हा तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंग अजूनही तसाच गडद होता. त्यामुळे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

मेघाच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबं प्रचंड धक्क्यात होती. तिच्या अचानक जाण्याचं कारण कोणालाच समजत नव्हतं. याच धक्क्यात असताना २२ मे रोजी आणखी एक हादरवणारी घटना समोर आली. मेघाचा पती सिद्धार्थनेही आत्महत्या केली.
सिद्धार्थ हा व्यवसायाने कंत्राटदार होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो पूर्णपणे शांत झाला होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. कुटुंबीयांपासूनही तो दूर-दूर राहत होता. शुक्रवारी सकाळी वडील परमाल सिंह यांनी सिद्धार्थला खोलीत पाहिलं नाही. त्यांनी घरभर शोध घेतला. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचं लक्षात आलं. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईक श्यामवीर यांनी दरवाजा तोडला. आत सिद्धार्थ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
विशेष म्हणजे, लग्नानंतर मेघा आणि सिद्धार्थ अवघे पाच दिवसच एकत्र राहिले होते. त्यानंतर मेघा माहेरी गेली आणि पुन्हा सासरी परतलीच नाही. या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? त्यांच्या नात्यात काही तणाव होता का? की मानसिक दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला? याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप कोणतंही स्पष्ट कारण समोर आलेलं नाही.
या संपूर्ण घटनेने ग्वाल्हेरमध्ये हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून दोन्ही मृत्यूंचा तपास सुरू आहे.