डायपर आणायला घराबाहेर पडला अन् काही मिनिटांत रक्ताच्या थारोळ्यात मृत आढळला तरुण; सोलापूर हादरलं

सोलापूर : “मी लगेच येतो…” एवढं सांगून घरातून बाहेर पडलेला २४ वर्षीय तरुण पुन्हा कधीच परतला नाही… सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडलेला तरुण काही मिनिटांतच रक्ताच्या थारोळ्यात मृत आढळल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत तरुणाचे नाव सुफियान गुलाम रसूल शेख (वय २४, रा. नई जिंदगी, सोलापूर) असे आहे. तो फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्याचा सुमारे दीड वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याला एक लहान मुलगाही आहे. कुटुंबीयांच्या मते, शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता तो “मुलासाठी डायपर आणतो” असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र काही क्षणांतच त्याच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला.
सुमारे ८ वाजता विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटजवळ सुरक्षा रक्षकाला एक तरुण जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता तरुण गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता.

दरम्यान, कुटुंबीय सुफियानला वारंवार फोन करत होते. तो न उचलल्याने चिंता वाढली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेला फोन उचलून कुटुंबीयांशी संपर्क साधला. “तो आता परत येणार नाही…” हे शब्द ऐकताच घरात एकच आक्रोश पसरला.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सुफियानच्या लहान मुलाचा चेहरा पाहून नातेवाईकांना अश्रू आवरता आले नाहीत. रोजच्या आयुष्याला सुरुवात करणारा एक तरुण असा अचानक निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
हा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अजूनही गूढ कायम आहे. पोलिसांनी घातपात, आत्महत्या किंवा अपघात या सर्व शक्यतांचा विचार करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून परिसरातील लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत.
पुढील तपासानंतरच या दुर्दैवी घटनेचा खरा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.