मुंबईकरांना फटका; वडापाव महागला, खिशाला बसणार झळ; महागाईचा थेट परिणाम…

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा भारतालाही मोठा फटका बसत असून, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधन दरांवर थेट परिणाम होत आहे.

गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा मोठा भार पडला आहे. पगारात वाढ नसताना वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे.
एलपीजी गॅसच्या किमतीतही वाढ झाली असून काही भागांत तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास ऊर्जा पुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाच्या किमती वाढल्याने हॉटेल आणि फास्ट फूड व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईतील लोकप्रिय वडापावच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता असून, सध्या काही ठिकाणी वडापाव 20 ते 35 रुपयांपर्यंत मिळू शकतो.

दरम्यान, दादरसारख्या भागात 20 ते 25 रुपयांना मिळणाऱ्या वडापावच्या दरात वाढ होण्याची शक्यता असून, महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर जाणवत आहे.