बारामतीत ‘ग्रीन गोल्ड’चा काळाबाजार उद्ध्वस्त! पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; तब्बल तीन कोटींचा गांजा जप्त


बारामती : पश्चिम महाराष्ट्रात शांतपणे पसरत असलेल्या गांजा तस्करीच्या जाळ्यावर अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. बारामतीत सुरू असलेल्या आंतरराज्य अमली पदार्थ रॅकेटचा थरारक पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर साहित्य असा जवळपास तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून छत्तीसगड ते पश्चिम महाराष्ट्र असा गांजा पुरवठ्याचा मोठा मार्ग उघड झाला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बारामती शहर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जळोची परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत संपूर्ण टोळीपर्यंत धडक मारली.

तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचून आरोपींना ताब्यात घेतले. या टोळीतील मुख्य आरोपी प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंह, राहुल गोरे, विकी उर्फ पप्पू कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंह आणि जॉकी माझी यांच्यासह इतर आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी छत्तीसगडमधून गांजा आणून पुणे, बारामती, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत त्याची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एका इनोव्हा गाडीचा पाठलाग करत १३४ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी विकी उर्फ पप्पू विजय कांबळे याला अटक करण्यात आली. त्यानंतर फलटण रस्त्यावर आणखी एका वाहनावर कारवाई करत पोलिसांनी २३ किलो गांजा हस्तगत केला. या प्रकरणी हुसेन लष्करे, आदित्य शिंदे आणि युवराज दुर्गे यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

याआधीच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या ४७८ किलो गांज्यासह एकूण ६३४ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे. बारामती, सांगली आणि इतर भागांत समन्वय साधत पोलिसांनी धाडसत्र राबवल्यामुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.

या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांच्या पथकाने ही मोठी कारवाई यशस्वी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!