हद्दीतील चंदन चोरी करणाऱ्या 7 अट्टल गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलीसांची मोक्का कायद्यान्वये कारवाई.

लोणी काळभोर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदन चोरी करणाऱ्या ७ अट्टल गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात रमेश बाबू करडे (वय ५२, रा. केडगाव, ता. दौंड), शाम तानाजी साळुंके (वय २९), संतोष अण्णा शिवरकर (वय ३०), दोघे रा. केडगाव बोरी पारधी, विशाल अनिल दामोदरे (वय २६, रा. वरवंड), फिरोज कचरू सय्यद (वय २९, रा. कासुर्डी) आणि पिंडू ऊर्फ लक्ष्मण भिमा गायकवाड (वय ३०, रा. निमोना, ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे. तर अमोल जाधव (रा. वाळवणे, ता. पारनेर) हा अद्याप फरार आहे.
ही घटना २८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.१५ वाजता थेऊर येथील पुनावाला स्टड फार्म येथे घडली. सात अज्ञात चोरट्यांनी सुरक्षारक्षकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून धमकी दिली आणि सुमारे ८० हजार रुपये किंमतीची चार चंदनाची झाडे तोडून त्यांचे ओंडके जबरदस्तीने चोरून नेले.

तपासादरम्यान ही टोळी संघटित गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. २१ मे रोजी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर या गुन्ह्यात मोक्का कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पथकाने कामगिरी केली.