तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून खुनाचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या


लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरातील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका विधीसंघर्ष बालकासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून त्याला गंभीर जखमी केले होते. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून विधीसंघर्ष बालकाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

ही घटना शनिवार (१६ मे) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सागर बार अँड रेस्टॉरंटमध्ये घडली. प्रसाद दिलीप शेंडगे (वय ३०, रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती) हे जेवण करत असताना मागील टेबलावर बसलेल्या चौघांनी “तु आमच्याकडे का पाहतोस? आम्ही येथील भाई आहोत,” असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी प्रसाद शेंडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बिअरच्या बाटल्यांनी डोक्यावर, छातीवर, नाकावर, कानावर आणि गळ्यावर वार केले. तसेच दगड फेकून “तुझा मर्डर करून टाकतो,” अशी धमकीही दिली.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी राज राजेंद्र पवार, सौरभ सुनील गायकवाड आणि राहुल संतोष घाडगे (सर्व रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती) यांना अटक केली असून १७ वर्षीय विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद शेंडगे यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी राहुल घाडगे याला नाशिक जिल्ह्यातील धिंडोरी येथून, तर राज पवार याला शिरूर येथून अटक केली. त्यानंतर सौरभ गायकवाड आणि विधीसंघर्ष बालकास लोणी काळभोर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, रुपाली जाधव व त्यांच्या पथकाने केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!