बोंबला! लग्न झालं की ३ दिवस ‘टॉयलेट बंद’; नवरा-नवरीवर लादली जाते अजब प्रथा, कारण ऐकून थक्क व्हाल

जकार्ता : लग्न म्हटलं की आनंद, उत्साह, नाच-गाणी आणि वेगवेगळ्या परंपरांचा रंगतदार संगम… पण जगात काही ठिकाणी लग्नानंतर अशा विचित्र प्रथा पाळल्या जातात की त्या ऐकून कोणाच्याही भुवया उंचावतील. इंडोनेशियातील एका समुदायात नवरा-नवरीला लग्नानंतर तब्बल तीन दिवस शौचालयात जाण्यास मनाई केली जाते. ही प्रथा इतकी कठोर मानली जाते की ती मोडणं म्हणजे मोठा अपशकुन समजला जातो.

इंडोनेशियातील ‘टिडॉन्ग’ समुदायामध्ये ही परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते. या समुदायातील लोकांच्या मते, लग्नानंतरचे पहिले तीन दिवस नवदांपत्यासाठी अत्यंत पवित्र मानले जातात. या काळात नवरा-नवरीने शौचालयाचा वापर केल्यास त्यांची पवित्रता नष्ट होते आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी त्यांची धारणा आहे.
विशेष म्हणजे, ही प्रथा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक मान्यतेपुरती मर्यादित नाही, तर तिच्यामागे नकारात्मक शक्तींविषयीची भीतीही जोडलेली आहे. टिडॉन्ग समाजातील लोकांचा विश्वास आहे की, शौचालय हे अशुद्ध ठिकाण मानले जाते आणि तेथे नकारात्मक ऊर्जा असते. लग्नानंतर लगेच नवदांपत्याने तेथे गेल्यास ती नकारात्मकता त्यांच्या आयुष्यात प्रवेश करू शकते.

या काळात नवरा-नवरीवर कुटुंबीयांकडून विशेष लक्ष ठेवले जाते. त्यांना कमी प्रमाणात अन्न आणि पाणी दिलं जातं, जेणेकरून त्यांना शौचालयात जाण्याची गरज भासू नये. अनेकदा कुटुंबातील सदस्य रात्रंदिवस त्यांच्यावर नजर ठेवतात. ही प्रथा मोडल्यास वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होतो, नातं तुटू शकतं किंवा मोठं संकट येऊ शकतं, अशी समजूत स्थानिकांमध्ये आहे.

आधुनिक काळात ही परंपरा अनेकांना विचित्र आणि धक्कादायक वाटत असली, तरी टिडॉन्ग समाजासाठी ती आजही श्रद्धेचा भाग आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये लग्नाशी संबंधित अनेक अनोख्या प्रथा पाहायला मिळतात. मात्र, नवरा-नवरीला तीन दिवस शौचालयापासून दूर ठेवण्याची ही परंपरा सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.