सुनेत्रा पवारांच्या जागेवर कोणाची वर्णी? राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा, राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या..

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. काही खासदारांचा कार्यकाळ संपला असून काहींनी राजीनामे दिल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. इच्छुकांकडून लॉबिंगलाही वेग आल्याची चर्चा असून राष्ट्रवादीचा ‘दिल्लीचा चेहरा’ कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांच्या जागेसह तामिळनाडूमधील एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून असणार आहे.

त्यानंतर 18 जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.