पुण्यात संतापजनक प्रकार; “माझी नाही झालीस तर संपवून टाकीन” म्हणत तरुणीवर ॲसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक…

पुणे : “तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी देत तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीला अटक केली आहे.

श्रीराम मधु सरुनवर (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, 21 वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. ही घटना 20 मे रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतात. काम आटोपल्यानंतर दोघेही आपल्या राहत्या घरी जात असताना आरोपीने त्यांचा रस्ता अडवला.

तरुणी त्याच्यासोबत राहत नसून मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणातून त्याने संतापाच्या भरात तरुणीला धमकावत तिच्यावर आणि तिच्या मित्रावर प्लास्टिकच्या ड्रममधील तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ फेकला.

या हल्ल्यात तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर गंभीर भाजल्या गेल्या, तर तिच्या मित्राच्याही पायाला दुखापत झाली. दोघेही जखमी अवस्थेत असताना आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.