एक क्लिक, एक नाव आणि कोट्यवधी फॉलोअर्सचा स्फोट! ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सोशल मीडियावर उडवला धुराळा; अकाऊंट बंदीने खळबळ


मुंबई : सोशल मीडियावर अचानक उदयाला आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने अवघ्या काही दिवसांतच डिजिटल जगात मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांतच इन्स्टाग्रामवर तब्बल 13 मिलियन फॉलोअर्स मिळवून या नव्या नावाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. इतक्या झपाट्याने वाढलेल्या लोकप्रियतेमुळे देशातील प्रमुख राजकीय पक्षांनाही या डिजिटल लाटेची दखल घ्यावी लागली आहे.

मात्र या प्रचंड चर्चेदरम्यान मोठी घडामोड घडली आहे. पक्षाचे अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट भारतात बंद करण्यात आले असून, अचानक झालेल्या या कारवाईमुळे समर्थकांमध्ये संभ्रम आणि चर्चा दोन्ही वाढल्या आहेत. अकाऊंट बंदीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचवेळी संस्थापक अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरही बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.

अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की ही कोणतीही नियोजित राजकीय पार्टी नाही, तर सोशल मीडियावरून निर्माण झालेली एक अपघाती चळवळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही कोणताही पूर्वनियोजित अजेंडा घेऊन आलो नाही. आमचे सध्या एकच उद्दिष्ट आहे—लोकांशी संवाद साधणे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणे.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, या पक्षाकडे सध्या मोठ्या प्रमाणात तरुण फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणे ही प्राथमिकता आहे. “जोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेत नाही, तोपर्यंत कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर ही डिजिटल चळवळ सुरू झाल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, यंत्रणांवर प्रश्न विचारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या मते, लोकशाहीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असून सर्वच पक्षांना प्रश्न विचारले जाणार आहेत.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली असून, काही जण याला डिजिटल क्रांती म्हणत आहेत तर काही जण याला फक्त ट्रेंड मानत आहेत. मात्र अल्पावधीत मिळालेली लोकप्रियता आणि त्यानंतर आलेली अकाऊंट बंदी यामुळे हा विषय आता देशभर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!