“तुझ्या पोटीचं मूल आम्हाला नको!”; जातीच्या द्वेषातून सुनेचा अमानुष छळ, ८ वेळा गर्भपाताचा आरोप; नाशिक हादरलं

नाशिक : प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका तरुणीच्या वाट्याला मात्र काळीज पिळवटून टाकणारा छळ आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. “तू आमच्या जातीची नाहीस” या कारणावरून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. एवढंच नव्हे, तर तिला तब्बल आठ वेळा गर्भपात करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप सासरच्या मंडळींवर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त होत असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी गोड बोलणाऱ्या सासरच्या मंडळींचा खरा चेहरा लग्नानंतर समोर आल्याचा आरोप तिने केला आहे. सुरुवातीला किरकोळ कारणांवरून टोमणे मारले जात होते. मात्र काही दिवसांनी जातीचा मुद्दा पुढे करत तिचा अपमान सुरू झाला. “तू आमच्या समाजातील नाहीस”, “तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही”, असे शब्द ऐकवत तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता.
महिलेने आरोप केला आहे की, गर्भधारणा झाल्यानंतर तिचा छळ आणखी वाढला. वारंवार वाद घालणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देत गर्भपातासाठी दबाव आणला जात होता. एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.

तक्रारीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. “तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात टाकू,” अशी धमकी देत सासरच्या मंडळींकडून तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जात होता. पीडित महिला पुण्यात नोकरी करत होती. मात्र जुलै २०२५ मध्ये ती नाशिकला परतल्यानंतर छळ अधिकच वाढल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, नाशिकमध्ये घर घेण्यासाठी पतीने तिचे सोन्या-चांदीचे दागिने विकून पैसे घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतरही हुंड्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी होत होती. जातीभेदामुळे घरात सन्मानाने वागणूक मिळत नसल्याने आपण पूर्णपणे कोलमडून गेल्याची भावना पीडितेने व्यक्त केली आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत म्हसरूळ पोलिसांनी पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.