दादांच्या 22 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेनंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; पक्षात लवकरच मोठे निर्णय होण्याची शक्यता…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांच्या पक्षातही सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेमुळे आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं.
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नसल्याने पक्षात नाराजी वाढल्याचं बोललं जात आहे. यानंतर पक्षातील अंतर्गत विसंवाद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतल्याचं समोर आलं आहे. सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यात काल महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय कार्यकारिणीमधील काही नावांबाबत फेरबदल करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये एका महिला लोकप्रतिनिधीसह सुबोध मोहिते यांना कार्यकारिणीतून वगळण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

दुसरीकडे, सुनेत्रा पवार गटातील २२ आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र, या मुद्द्यावर शरद पवार यांनी मौन बाळगल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट करत विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.