बाजारातून आंबे आणले अन् आमरस खाल्ला; एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा, अहिल्यानगरातील घटनेने खळबळ


अहिल्यानगर : आंब्याच्या हंगामात आमरस खाण्याचा आनंद घेत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आमरस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तब्बल सात जणांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्ती परिसरातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरे वस्ती परिसरात राहणाऱ्या जायभाय कुटुंबाने काही दिवसांपूर्वी बाजारातून आंबे खरेदी केले होते. शनिवारी सायंकाळी कुटुंबातील सदस्यांनी त्या आंब्यांचा आमरस करून खाल्ला. मात्र काही वेळातच त्यांना चक्कर येणे, तोल जाणे आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवू लागली.

स्थिती गंभीर होताच कुटुंबातील सदस्यांना तातडीने अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय, रेणुका जायभाय, सागर जायभाय, अभिजित जायभाय, पूनम जायभाय, शीतल जायभाय आणि चार वर्षीय अवनी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ही प्रकृती बिघडल्याची शक्यता आहे. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉ. सचिन पाटील यांनी दिली आहे.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बाजारातून आणलेल्या फळांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!