एका दिवसात सराफा बाजारात मोठा उलटफेर! सोन्याचा वेग थांबला, चांदी थेट कोसळली; ग्राहक आणि गुंतवणूकदार संभ्रमात

मुंबई : काही दिवसांपासून सातत्याने नवे विक्रम करत धावणाऱ्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागला आहे. आज सकाळी बाजार उघडताच सोनं आणि चांदी दोन्हींच्या दरात मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात एकच खळबळ उडाली. कालपर्यंत दर आणखी वाढतील या भीतीने खरेदी पुढे ढकलणारे ग्राहक आता पुन्हा दुकानांकडे वळताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे गुंतवणूकदार अजूनही संभ्रमात असून “आता खरेदी करावी की आणखी घसरणीची वाट पाहावी?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी सुमारे १ लाख ५८ हजार ७१० रुपयांवर नोंदवला गेला. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण झाली असून २२ कॅरेट सोन्याचा दरही खाली आला आहे. २२ कॅरेट सोनं आज सुमारे १ लाख ४५ हजार ४८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीच्या दरात तर आणखी मोठी पडझड झाली असून प्रति किलो चांदीचा दर २ लाख ६७ हजार १९० रुपयांवर आला आहे. एका दिवसात चांदीत सुमारे ३ हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील प्रमुख सराफा बाजारांमध्येही याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. जळगावमध्ये काल १ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर असलेलं सोनं आज १ लाख ५६ हजार ५०० रुपयांवर आलं आहे. तर चांदीचा दर २ लाख ७० हजारांवरून थेट २ लाख ५५ हजार रुपयांवर घसरला आहे. हे दर वस्तू व सेवा कराशिवाय असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सोन्या-चांदीच्या दरात घट पाहायला मिळाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५८ हजार ७१० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा दर २ लाख ६७ हजार १९० रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये सोन्याचा दर १ लाख ५८ हजार ८२० रुपयांच्या आसपास राहिला, तर चांदीचा दर २ लाख ६८ हजार रुपयांवर स्थिरावला.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, अमेरिका-इराण संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि भारताने मौल्यवान धातूंच्या आयातीवर घातलेले काही निर्बंध यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होणारे बदलही या दरांवर परिणाम करत आहेत. अमेरिका-इराण चर्चेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने आणि जागतिक बाजारातील महागाईचा दबाव काहीसा कमी झाल्यानेही सोन्याच्या किमतींवर परिणाम झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.
दरम्यान, बाजार विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दर घसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने खरेदी करणं अधिक सुरक्षित ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं अजूनही सुरक्षित पर्याय मानलं जात असलं तरी अल्पकालीन काळात मोठे चढ-उतार कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवसांत बाजाराची दिशा काय राहणार, याकडे आता संपूर्ण सराफा बाजाराचं लक्ष लागलं आहे.