‘नंदनवन’वरील गुप्त भेटीनं राजकारण हादरलं! ठाकरेंना मोठा धक्का बसणार? ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत

हिंगोली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रात्री उशिरा झालेली एक गुप्त भेट, त्यानंतर वाढलेली कुजबुज आणि ठाकरे गटात निर्माण झालेली अस्वस्थता… या सगळ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अचानक तापलं आहे. ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर “ऑपरेशन टायगर” पुन्हा सक्रिय झाल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुंबईतील ‘नंदनवन’ या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडल्याचं सांगितलं जात असून, भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही नेते आणि खासदार महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे या भेटीकडे केवळ शिष्टाचार भेट म्हणून पाहिलं जात नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, भेटीचं कारण विकासकामं आणि मतदारसंघातील प्रश्न असल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकीय पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “ऑपरेशन टायगर” अंतर्गत ठाकरे गटातील नाराज नेत्यांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे आणखी खतपाणी मिळालं आहे.

यापूर्वीही अशाच चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी “कोणतीही पक्षफोड सुरू नाही” असं स्पष्ट केलं होतं. मात्र, प्रत्यक्ष भेटीगाठी वाढत असल्याने ठाकरे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचं बोललं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानपरिषद निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणं लक्षात घेता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून या भेटीवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे — “महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार का?”