संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत तरुणावर हल्ला; आई-वडिलांनाही मारहाण; लोणीकाळभोर येथील घटना…

लोणी काळभोर : छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान भा़डणात झाले असून रूपांतर भांडणात झाले आहे.

मोटारसायकल पुढे घेण्याच्या कारणावरून एका तरुणास दांडके आणि दगडांनी हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रमोद मोहन काळभोर (वय ३०, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभि आहेरकर, अभिषेक रामपुर, पम्या शिरसट यांच्यासह इतर साथीदारांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळभोर हे गावात औषध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असल्याने मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली होती. ते मोटारसायकलसह थांबले असताना मागून आलेल्या काही तरुणांनी त्यांना वाहन पुढे घेण्यास सांगितले.

पुढे गर्दी असल्याचे सांगताच त्या तरुणांनी शिवीगाळ सुरू केली. वाद वाढत असल्याचे पाहून काळभोर हे मोटारसायकल घेऊन घराकडे निघाले. संबंधित तरुणांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. तारासिटीसमोरील कामठे यांच्या टपरीजवळ प्रमोद मोटारसायकल लावत असतानाच आरोपी तेथे पोहोचले आणि एकाने हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्यावर वार केला.
त्यानंतर काही जणांनी रस्त्यावरील दगड उचलून प्रमोद यांच्या डोक्यावर आणि अंगावर फेकले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. प्रमोद यांच्या आरडाओरड्यानंतर त्यांचे आई-वडील मदतीसाठी बाहेर आले. आरोपींनी त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
परिसरातील नागरिक जमा होताच काही आरोपी मोटारसायकली घटनास्थळी टाकून पसार झाले. घटनास्थळी सोडून दिलेल्या दोन मोटारसायकलींचे क्रमांकही फिर्यादीने पोलिसांना दिले आहेत.
याप्रकरणी अभि आहेरकर, अभिषेक रामपुर, पम्या शिरसट यांच्यासह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.