लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! पुन्हा ई-केवायसीची संधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी भर सभेत सांगून टाकलं…

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3000 रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले असले, तरी लाखो महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ई-केवायसी अपूर्ण राहणे, बँक खात्यातील त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांचे पैसे अडकले असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील तब्बल 70 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे या महिलांना यावेळी लाभ मिळालेला नाही. त्यामुळे “आमचे पैसे कधी मिळणार?” असा सवाल लाभार्थी महिला करत आहेत. तसेच ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास पुन्हा संधी दिली जाणार का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. प्रत्येक पात्र महिलेपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच ई-केवायसी प्रक्रिया सतत सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर ज्या महिलांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांना पुन्हा एकदा प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.सरकारकडून लवकरच याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
