कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार मैदानात, हजारो शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन…

नाशिक : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः नागवला गेला असून त्याचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना तर कवडीमोल भावात कांदा विकल्यानंतर त्यातून वाहतूक भाडेही न निघाल्याने ते खिशातून देण्याची वेळ आली. यामुळे आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटातील आमदार खासदार यांनी आज आंदोलन केले.

शरद पवार गटाने कांद्याला भाव देण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्वांत मोठ्या कांद्याच्या लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा काढून आणि रस्त्यावर ठिय्या देत कांदा-भाकर खाऊन आंदोलन केले आणि सरकारचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी खासदर निलेश लंके, भास्कर भगरे गुरुजी सुनीलजी भुसारा, माणिकराव शिंदे, डॉ. गुंजाळ, लासलगाव बाजार समिती उपसभापती संदीप पुंडलिक दरेकर, संचालक जयदत्त काका होळकर, आदी उपस्थित होते.
तसेच सोनिया सत्यजीत होळकर, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बंडू सुरशे, नरेंद्र वाढवणे यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) नितीन आहेर, निफाड पूर्व तालुका प्रमुख शिवा सुराशे, निफाड तालुका प्रमुख विक्रम रधवे, संतोष पानगव्हाणे, सद्दाम शेख, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते गुणवंत होळकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास चांदर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले, कांद्याचा उत्पादन खर्च किलोमागे १७ ते २० रुपये असताना खरेदीचा भाव साडेबारा रुपये असेल, तर हा शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. त्यामुळं सरकारने नाफेडऐवजी २५ रु. किलोप्रमाणे बाजार समितीतच शेतकऱ्यांकडील सर्व कांद्याची खरेदी करावी आणि यापूर्वी मातीमोल भावात कांदा विकण्यात आलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे १५ ते २० रुपये अनुदान देण्याची आमची मागणी आहे.

सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे आणि अन्नदात्याची ही मागणी मान्य करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून यापुढे अधिक तीव्र आंदोलन करू, याची सरकारने दखल घ्यावी,असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात कांदा प्रश्नावरून सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.