“अजितदादांना सर्वाधिक मानसिक त्रास रोहित पवारांनीच दिला”; राष्ट्रवादीत आरोपांची ठिणगी, नेत्यांचा थेट हल्लाबोल


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच आता अजित पवारांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणात अजित पवार गटाने थेट रोहित पवारांवर गंभीर आरोप करत मोठा राजकीय हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि कार्यालयीन सचिव संजय तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत रोहित पवारांवर जोरदार टीका केली. “अजितदादांना जर कुणी सर्वाधिक मानसिक त्रास दिला असेल, तर तो रोहित पवारांनीच दिला,” असा थेट आरोप उमेश पाटील यांनी केला.

“रोहित पवार हे तुतारी चिन्हावर निवडून आले असले तरी त्यांचं लक्ष कायम आमच्या पक्षावरच असतं. अजितदादा जिवंत असतानाही त्यांना लक्ष्य करण्यात आलं. आता त्यांच्या निधनानंतर सहानुभूती आणि राजकीय वारसा स्वतःच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

दरम्यान, रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांविषयी खालच्या पातळीवर बोलणाऱ्या एका नेत्याचा ध्वनिमुद्रित संवाद असल्याचा दावा केला होता. हा संवाद सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे तो नेता नेमका कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

याच पत्रकार परिषदेत पक्ष कार्यालयातील कथित प्रवेशबंदीच्या चर्चांवरही स्पष्टीकरण देण्यात आलं. अविनाश आदिक यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेशबंदी केल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. “प्रफुल पटेल आजही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सुनील तटकरेदेखील आपल्या पदावर कायम आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

चुकीच्या बातम्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला. राष्ट्रवादीतील हा वाढता संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!