क्षणात होत्याचं नव्हतं! मुळशीतील भीषण धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू; ठाकरे गटाचे प्रकाश भेगडे जखमी

पुणे : रविवारची दुपार… मुळशीतील चांदे-मूलखेड रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. पण काही क्षणांतच जोरदार धडकेचा आवाज झाला आणि संपूर्ण परिसर हादरला. भरधाव फॉर्च्युनर आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्यासह तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदे-मूलखेड मार्गावर भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनरची समोरून येणाऱ्या रिक्षाशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. रिक्षाचालक विकास अर्जुन पारखी यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले.
या अपघातात फॉर्च्युनरमधील तिघेजण जखमी झाले असून त्यामध्ये ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांचाही समावेश आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातानंतर काही काळ चांदे-मूलखेड मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर वाहनांचे अवशेष विखुरले होते. पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. वेग, निष्काळजीपणा आणि रस्त्यावरील परिस्थिती याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
या अपघातानंतर पुन्हा एकदा मुळशी परिसरातील धोकादायक वेग आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून या मार्गावर कडक वाहतूक नियंत्रणाची मागणी जोर धरू लागली आहे.